Thursday, March 14, 2019

मुंबईकरांचे मरण इतके स्वस्त का?

मुंबईत सीएसएमटी स्थानकाजवळ आज पुन्हा एकदा पूल कोसळला, काय चाललंय काय? मुंबईत माणूस ना घरात सुरक्षित आहे, ना रस्त्यावर, ना रस्त्याच्या पुलावर, ना रेल्वेच्या पुलावर, ना रेल्वेत. मरण कधी, कुठून, कुठल्या स्वरूपात तुमच्यावर घाला घालेल, कुठलीही शास्वती नाही.

ना शासन गंभीरआहे, ना प्रशासन, ना नेते, ना जनता! जनता अशाकरता की, मुंबईला नेहमीच दुर्घटना होत असतात, आणि आम्ही म्हणतो, मुंबई कधीच थांबत नाही, आणि मुंबईकर दोन दिवसांत घटना विसरून आपल्या नोकरी धंद्याला लागतो, मुंबईकर मराठी-अमराठी, हिंदू-अहिंदू ह्या मुद्यावर तासंतास, दिवसेंदिवस, महिनोन्महिने चर्चा करेल, पण जीवघेण्या दुर्घटना कशा विसरू शकतो? म्हणून जनता देखील जबाबदार! 

एल्फिस्टंट, अंधेरी, येथील दुर्घटना झाल्यानंतर अनेक वल्गना झाल्या होत्या, मुंबईतील सगळ्या पुलांचे ऑडिट करण्यात येणार असे सांगितले होते, मात्र अंधेरी दुर्घटनेनंतर इतक्या कमी वेळात जर पुलाचा भाग कोसळत असेल तर कसलं ऑडिट केले तुम्ही. पुलाचा कोसळलेला भाग पाहिला तर लक्षात येते की, पुलाचा भाग अगदीच जर्जर झाल्याचे जाणवते, आणि मग पूल राहदरीकरिता बंद का नाही केला? का लोकांना मारण्यासाठी पुलावरून आणि पुलाखालून जाऊ दिले? आणि दैवाचे मला कळत नाही ते समान्यांनाच का मारते?

सध्याचे युग हे स्मार्ट युग आहे, स्मार्ट फोन, स्मार्ट टिव्ही, आणि आता स्मार्ट सिटी, कसली डोबल्याची स्मार्ट सिटी? आहे ते सांभाळता येत नाही, आणि आम्ही स्मार्ट सिटीच्या थापा मारतो. दोष कुणाचा, हद्द कुणाची, जबाबदारी कुणाची, हे ठरतानाच केस दम तोडले. मला एक कळत नाही, अधिकाऱ्यांनी किंवा अगदी सैन्याने केलेली कामे किंवा पराक्रमाचं क्रेडिट घेणारे राजकारणी अशावेळी मात्र तोंड लपवून का पळताना दिसतात? चौकशी करू, समिती गठीत करू, शिक्षा करू अशी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. कुठल्याही दुर्घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा देणारे बहादुर 'लाल' कमीच!


मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुलाची ही परिस्थिती तर मुंबईतील इतर पुलांचे न बोललेलेच बरे. का ह्या घटनेला खुनाचा आरोप लागू होऊ नये? जर तूम्ही लोकांना मरायला मोकळे सोडता, तर का तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ नये? का शिक्षा होऊ नये? जन्मठेप किंवा फाशी होऊ नये? राजकारण्यांनो, अधिकाऱ्यांनो, तुम्ही निष्पाप जिवांचे खुनी आहेत. ह्यावेळी शिक्षा झालीच पाहिजे, जबाबदार कोण? हे समोर आलंच पाहिजे, रस्त्यावर थुंकल्याबद्दल लोकांना शिक्षा देणारी महापालिका आणि सरकार निष्पाप जनतेच्या मारेकऱ्यांना शिक्षा देईल का?

Sunday, December 31, 2017

माझा नगरसेवक My Corporator

माझा नगरसेवक

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, सगळेच पक्ष आणि हौशे गवशे तयारीला लागलेत. हल्ली ग्रामपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुका देखील विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे महत्वाच्या वाटायला लागलेत, किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडलेय. अनेक पक्ष निवडणुकीत उतरतातच पण कितीतरी अपक्ष देखील आपलं नशीब आजमावतात. अनेक जण तर आपण शंभर टक्के हरणार ह्याची खात्री असताना आपलं नशीब आजमावताना दिसतात. अशा लोकांकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, ते नशीब आजमावत नसतात, तर विरोधी उमेदवारांना आजमावतात. समोरच्यावर दबाव टाकायचा, काही तोडपाणी होते का पहायचे, काही मिळालं तर गप्प बसायचं, नाही मिळालं तरी काही हरकत नसते, जास्तीत जास्त काय होईल? डिपॉजीट जप्त होईल.

हल्ली राजकारण म्हणजे पोराबळांचा खेळ झालाय, ह्या फ्लेक्स संस्कृतीने राजकारण खूप सोप्प केलंय. गावात, शहरात एक कोपऱ्याकोपऱ्यावर फ्लेक्स लावायचे, डावीकडे वरच्या कोपऱ्यात पक्षातील मोठ्या नेत्याचे, आपण ज्या मोठ्या नेत्याचे समर्थक आहोत त्यांचे असे उतरत्या क्रमाच्या आकाराचे फोटो लावायचे, मध्ये एखाद्या भाऊ दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुठलं तरी पद मिळाल्याबद्दल शुभेच्छा, नाहीतर नागरिकांना दिवाळीच्या, गणपतीच्या, ईदच्या, ख्रिस्तमसच्या शुभेच्छा, दादा, भाऊ, भाईचा मोठा फोटो, आणि खाली दोन ते चार रांगेत असंख्य छोटेछोटे फोटो, पंटर लोकांचे. मला नेहमी प्रश्न पडतो तो हा की हे छोटे फोटो कुणी कौतुकाने पाहत असतील का? मला पक्की खात्री आहे, ज्याचा फोटो लावलाय तोच फक्त आपला फोटो पाहत असावा. शहराचं, गावचं विद्रुपीकरण ह्या फ्लेक्समूळे होते, पण त्याचं ह्यांना काय? आपली छबी चमकवून घ्यायची, आपलं काम भागतं नं, झालं तर.

जन्मापासून मरणापर्यंत एकाच पक्षात राहून, कुठल्याही पदाची, सत्तेची, मोबदल्याची लालसा न ठेवता निष्ठेने काम केलेली अनेक उदाहरणे आहेत. दोन वेळा आमदार राहिलेले व झोपडीत राहणारे पंजाबचे आमदार शिंगारा राम किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री, जे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तिसऱ्या टर्मवेळी पहिल्या टर्मपेक्षा गरीब झाले होते, इथे पाच वर्षात तीनशे टक्के संपत्ती वाढण्याची उदाहरणे असताना अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांची कितीशी उदाहरणे आपण आजूबाजूला पाहू शकतो? पैसा ओतायचा आणि निवडुन आल्यावर पैसा कमवायचा हा एकमेव हेतू जास्तीत जास्त राजकारण्यांचा असतो, नाहीतर, तुटपुंज्या भत्त्यासाठी आणि दिवसरात्र लोकांचा त्रास सहन करण्यासाठी कोण लोकप्रतिनिधी होणार?

कुठल्या तरी पक्षाशी बांधील राहून निष्ठेने राजकारण करायचं असते, असं समजणं म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. आणि आता तर सगळ्याच पक्षातील राजकारण्यांनी ते आपल्या हरकतींनी सिद्ध देखील केलंय, मागच्या चार-पाच वर्षात एका मोठ्या पक्षात सामील व्हायची जणू शर्यत लागलीय, आपलं शहर देखील त्याला अपवाद कसं असेल? काल नामांकनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत किती कोलांट्या उड्या आपल्याला पहायला मिळाल्या? जो पक्ष तिकीट देईल तो आपला, हेच वातावरण सगळीकडे होतं. अगदी अजून मला कोण कुठल्या पक्षात आहे हे स्पष्ट समजलं नाही, ज्याला समजलं असेल ती व्यक्ती खरोखरच पूजनीय! आणि तिकीट मिळून सुद्धा निष्ठा त्या पक्षाशी हे उमेदवार ठेवतील ह्याची काहीच खात्री नाही. माझा मित्र सांगत होता, त्याने एक पक्षाच्या महिला उमेदवाराला, दुसऱ्या पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला असं सांगताना ऐकलं की, 'तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला करीन', झालं? म्हणजे कुणी कुणावर भरोसा ठेवायचा? माझ्या एका मित्राला निवडणूक लढवायची होती, पण पक्षाने तिकीट दुसऱ्या कुणाला तरी दिले, मग हा शांत बसला, पण शेवटच्या दिवशी कळलं की तो तिकीट मिळालेला माणूस शेवटच्या क्षणी दुसऱ्याच पक्षात गेला, मित्राने पुन्हा धावपळ केली, पण उमेदवारी मिळाली नाहीच.

हल्ली एक ट्रेंड आलाय, अमुक तमुक नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यांसकट अमुक तमुक पक्षात प्रवेश, मग प्रवेश करताना येणाऱ्या नेत्याच्या गळ्यात पक्षाचा गमचा घालून स्वागत आणि फोटो, आपण त्याला कशे अपवाद असू? इथेही खूप गाजावाजा करून इतर पक्षात गेलेले, गमचा गळ्यात घालून काढलेले फोटो आपण पाहिले. पण इथे गम्मत निराळीच, परवा धुमधडाक्यात दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश केलेले आज स्वगृही परत, आणि फोटो पाहिले तर काय? पुन्हा जंगी स्वागत? हसावं की रडावं? काहीच कळत नाही. अशा फटाफट निष्ठा बदलतात ते आपले प्रतिनिधी! आणि ह्याला कुठलाच पक्ष अपवाद नाही, राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही हेच खरं, आणि ही अस्पृश्यता मानत नाही, तेच राजकारणात यशस्वी होतात, हेही तितकेच खरं! तुमच्यामाझ्यासारखे इथे कशे टिकणार?

ही झाली उमेदवार आणि राजकारण्यांची गोष्ट, पण मतदारांची गोष्ट ह्यापेक्षा वेगळी नाही, किंबहुना राजकारणी जर बिघडले असतील तर त्याला जबाबदार दुसरं तिसरं कुणीही नाही, फक्त आणि फक्त आपण, आपण मत देताना काय पाहतो? एक तर पक्ष, आणि पक्ष उमेदवारी देताना त्या व्यक्तीत काय पाहतात? निवडुन येण्याची क्षमता! सच्चा कार्यकर्ता ह्या सर्व घडामोडीत कुठे दिसतो? साहेबाच्या मागे! तर, आपण जबाबदार कसे? माझा मित्र सांगत होता, तो निवडणुकीला उभा राहणार आहे इतकं कळलं मात्र, आणि तीनचार गट येऊन त्याला भेटून गेले, 'आम्हाला इतके द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहेत', आपल्याला निवडणुका कळल्याच नाही, क्षणिक फायद्यासाठी आपण हे विसरतो की आपण निवडुन दिलेला उमेदवार हा पांच वर्षे आपली कामं करण्यासाठी असतो, आपण काय करतो? निवडणुकीच्या वेळी आपल्या उमेदवारांना आपण आपल्या मागण्या सांगतो, इतके पैसे द्या, मंदिर बांधून द्या, क्रिकेटचं किट द्या, सोसायटीत सीसीटीव्ही लावून द्या, आणि मतदानाच्या आदल्या रात्री किंवा मतदानाआधी ठराविक रक्कम द्या. झालं आपल्या अपेक्षा ह्यापेक्षा काही नसतातच, मग उमेदवार तरी आपल्याकरता का पांच वर्षे काम करतील?

ह्या निवडणुकीत चला आपण एक पण करु, की मी कुठल्याही उमेदवाराला पैसे घेऊन किंवा कुठल्याही लालचेने मतदान करणार नाही, सच्चा उमेदवार, जो माझ्या अडचणी समजून, माझ्या प्रभागातील अडचणी समजून कार्य करेल, निधीचा पुरेपूर आणि योग्य वापर करून जनतेच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करेल. अगदी 'न खाऊंगा, न खाने दुंगा' उमेदवार मिळणं ही अपेक्षा ठेवा, असं सांगण्याचा आगाऊपणा मी करणार नाही, कारण ह्या पातळीवर ते केवळ कठीण नाही तर अशक्य आहे. पण आपण सुरवात तर करु या, आज आपल्या प्रयत्नाला शंभर टक्के यश येईल हे सांगणं धाडसाचे होईल पण म्हणून प्रयत्न करुच नाही असे कुणी म्हटलंय? आज सुरुवात आपण करु, योग्य उमेदवार निवडून, राजकारणात आज ज्या वाईट प्रवृत्ती राज्य करु राज्य करु पाहताहेत, कदाचित त्या प्रवृत्तीच्या शेवटाची ही सुरुवात ठरावी! आणि ज्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल, उद्या तुम्ही अभिनमनाने म्हणाल, हो, हा माझा नगरसेवक!


Monday, March 7, 2016

माणूस मेला तरी चालेल

आज कामानिमित्त बडोद्यात होतो, कारमधून चाललो होतो. सोबत जो ड्राईवर होता, त्याचे नाव होते जाहिर! 100 मीटर गेलो असू, तोवर एक मनुष्य नो एंट्रीतुन येऊन आमच्या कार समोर उभा, थोडक्यात आमची उरभेट टळली. जहिरला म्हटले सांभाळून.
थोड्या पुढे गेलो, गाडीने वेग घेतला होता, इतक्यात रस्त्याच्या कडेने चाललेल्या दोन गाईंपैकी एका गाइने दुसऱ्या गाईला धक्का दिला व ती आमच्या गाडीसमोर आली, जहिरने आपले सर्व कौशल्य पणाला लावून गाडी थांबवली. मलाही थोड़े अस्वस्थ झाले, स्वतःला सावरत मी जहिरला सांगितले, "अरे बाबा, जरा हळू, मगाशी त्या माणसाला उडवले असते तर चालले असते, पण गाईला सांभाळ बाबा."

माझ्या तोंडून निघालेले हे शब्द सहज, म्हणजे माझ्या नेहमीच्या विनोदबुद्धीला अनुसरून निघाले का? अन्य परिस्थितीत असे शब्द माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्तीच्या तोंडून निघणे शक्यच नव्हते. आम्ही गायी-म्हशी वाली माणसं, आयुष्य त्यांच्याबरोबरच चालू झाले. सर्व पडतात म्हणून गाईंच्या पायाही पडलो, गाईँना नैवेद्य खायला दिला, त्यांची पूजा केली, आणि सर्वात जास्त त्यांना चोपही दिला. नीट घराकडे नाही परतली, द्या चोप, वासराजवळ जाऊन सर्व दूध त्याला प्यावयास दिले, द्या चोप. आज आम्ही जरी गुराढोरांपासुन दूर झाले असलो, तरी मला खात्री आहे, ज्यांचा आजही दुग्धव्यवसाय आहे, काही नं काही कारणांस्तव आपल्या गुरांना चोप देत असणार. अर्थात त्यात गाईही आल्याच.

काही गाईंना चोरगाय असेही लेबल असते, कारण ती कुणाच्याही शेतांमधे, कुंपणामधे जाऊन बिनदिक्कत चरत असते. माणसाला सृष्टीने सतसद्विवेक बुद्धि देऊनही माणसं जर चो-यामा-या करत असतील, तर ती तर मुका प्राणी, तिला ना सिमा कळत, ना कुंपण कळत, आणि राजकारण तर अजिबात कळत नाही. आणि गाईला आज जो दर्जा भारतात आहे, त्याबद्दल तीला काही माहीत असावे का? इतर सर्व मुक्या प्राण्यांप्रमाणे भूक लागली असेल तर जे काही मिळेल ते खायचे, इतकेच बिचारीला माहीत!

आणखी एक गोष्ट मला इथे जाणवली, आज गाईंची किंमत, समाजात वाढलीय, की माणसांची कमी झालीय. हे फक्त प्रचलित किंवा चलनातील वाक्य म्हणून त्याच्याकडे पाहु नये, आज जिथे काही लोक म्हणतात, की "गाय हमारी माँ है (बैलाला काही दर्जा आहे का हो आपल्या जीवनात), उसके खातिर हम मरने मारने को तैयार है". थोडक्यात काय? गाईकरता आम्ही कुणालाही मारु शकतो, स्वतःला मारू शकतो, ह्यातल्या पहिल्या अर्ध्या वाक्याप्रमाणे हे वागु शकतात, पण मरायची वेळ येते तेव्हा, सामान्य कार्यकर्ता आहे की? लाख मेले चालतील, पण पोशिंदा? अहो पोशिंदा मेला, तर हे वाद कोण उभे करणार, माणसाला माणसाशी भांडायला कोण लावणार?
माझ्या लहानपणी घराघरात एक गाईचा फोटो दिसायचा, त्या गाईच्या अंगभर देवाचे फोटो दिसायचे, आज तसे फोटो क्वचितच दिसतात, पण त्याकाळी, आज जसे वाद गाईंवरून होतात, तसे होताना दिसत नसत. कदाचित तेव्हाही गोरक्षक होतेच, पण त्यांना योग्य बळ मिळत नसावे, जसे आज मिळतेय. त्या फोटोतल्या गाईंचा अर्थ आज कळतो. मगाशी चोरगाईंचा उल्लेख आला. आणखी एक प्रकार आहे, भाकड गाईंचा, म्हणजे अशा गाई ज्या म्हणजे गाभण राहु शकत नाही, वंध्यत्वामुळे म्हणा किंवा वार्धाक्यामुळे म्हणा, गरीब शेतक-याला अशा गाई म्हणजे ओझे असतात. आणि अशा अनेक गाई कसाईखान्यात लोकांनी विकलेल्या मी पहिल्या आहेत. अर्थात दुभात्या गाई कुणीही विकणार नाही, हे तर स्पष्ट आहे. आज गोरक्षणासाठी सरसावलेल्या किती जणांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले असेल याची मला कल्पना नाही, किंबहुना किती जणांनी गाई पाळल्या असतील, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. व्यवसाय म्हणुन नाही तर गोमाता म्हणून एक तरी गाय घरी ठेवायला काय हरकत आहे? स्वतःच्या मातेला घराबाहेर काढणा-या व्यक्तींना गोमाता, जीला घराबाहेर बंधतात, घरात घेणे किती झेपेल हाही एक प्रश्नच आहे.
जगभरात गाईंच्या साधारण आठशे जाती आहेत. भारतात साधारण चाळीस शुद्ध भारतीय जाती आहेत. एक पाहणीनुसार देशी, अर्थात भारतीय जाती पुढील दहा पंधरा वर्षात नष्ट होतील, कारण सध्या अस्तित्वात असलेल्या जास्तीत जास्त गाई ह्या संकरित आहेत, देशी गाई फक्त गरीब शेतक-यांकडेच आहेत. दूध देण्याची संकरित गाईंची सरासरी, देशी गाईंपेक्षा दुपटीहुन अधिक आहे. त्यामुळे दुग्धव्यवसायींकांचा कल संकरित गाईंकडे जास्त असतो. आता प्रश्न आहे फक्त भारतीय गाईंना माता मानावे की संकरित, परदेशी पैदायीशींच्या गाई सुद्धा आपल्या माता आहेत, हे स्पष्ट झालेले नाही, कारण परदेशी गाई मग त्यात इंग्लिश आल्या आणि इटालियन सुद्धा आल्या, नेता म्हणून इटालियन बाई आपल्याला  चालत नाही, गाई तरी चालतील का हा प्रश्नच आहे. अगदी पाकिस्तानी गाईही असाव्यात, त्या तर मुळ भारतीयच असतील. आपल्या गोमातेला पाकिस्तानच्या ताब्यातुन मुक्त करण्यासाठी कुठलाही कार्यक्रम दिसत नाही. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे जगभरात गाई आहेत, गोमांसाचे सेवनही जगभरात होत असावे, ते आपण कसे खपवून घ्यावे, भारतात आपण आपल्या लोकांविरोधात गोसन्मानासाठी भांडतो, परदेशात ज्या गोहत्या राजरोस होत आहेत, त्या कोण थांबवणार? की तिथल्या गाई गोमाता व्याख्येमधे बसत नाही?

कुणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकांनी कायद्याच्या चौकटीत राहिलेच पाहिजे, हेही मी मानतो. भारतीय संघराज्याचे गृहराज्यमंत्री किरण रिजुजु हे मागे म्हटले होते की ते देखील गोमांस खातात. कदाचित बैलाचे मांस असेल. भारतात बीफ हा जो काही प्रकार आहे, तो फक्त मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजच खात असावा, हा समझ खोटा आहे. इतर धर्मीयही खात असावे. बीफ हे इतर मांस प्रकारापेक्षा स्वस्त असते व त्यामुळे देखील ते खाल्ले जात असावे. माझ्यासारख्या मांसहारी परंतु बीफ हा प्रकार न आवडणा-या व्यक्तीलाही घराबाहेर, उपहारगृहात मांस खाताना, ते बीफ तर नसावे नां असा नेहमी संशय येतो, तो ते स्वस्त असल्याने, आणि म्हणूनच त्याची भेसळ करणे सोपे व सोयीचे जात असावे. तरीही मला स्वतःला असे वाटते की, काय खायचे यावर बंधने घालणे योग्य नाही, गोमांसावर बंदी महाराष्ट्रात ऐशीच्या दशकापासून आहे, परंतु आता गोवंश हत्या बंदी कायदा झालेला आहे.

गाई मुस्लिम किंवा ख्रीस्तांसाठी फक्त एक खाद्यपदार्थ आहे का? अर्थात नाही. कितीतरी मुस्लिम आणि ख्रीस्त बांधव गाई पाळतात त्या दुग्धव्यवसायासाठी. त्यांच्या मनात गाईंबद्दल ती भावना नसावी, जी एका सनातन हिंदुच्या मनात असते, पण गाईंचे पालन नक्की आस्थेने होत असावे, यात शंका नाही. उलटपक्षी गाईंचे आणि धर्माचे राजकारण करणा-या एका नेत्याची, मांस निर्यात करणा-या कंपनीत भागीदारी असल्याचे मध्यांतरी व्रुत्तवाहिन्यांनी उघड केले. थोडक्यात आपल्या सोयीने व आपल्या शर्तीवर गोधर्म पाळणारे अनेक मिळतील. ह्यातले सच्चे गोप्रेमी किती असतील, हा संशोधनाचा विषय आहे.

आज भारतात शेकडोंनी बलात्कार रोजच्या रोज होत आहेत, डझनवारी खून रोज भारतात होतात. स्त्रीची इज्जत लुटली जात असताना, कुठलाही नेता असा नाही, जो म्हणेल, स्त्रीच्या सन्मानासाठी आम्ही मरणा-मारण्यास तयार आहोत. हिन्दू धर्मग्रंथात स्त्री सन्मानाची शिकवण नाही? सीता हरणामुळे रामायण व द्रौपदी चिरहरणामुळे महाभारत घडल्याचे दाखले धर्मग्रंथात आहेत. का स्त्रीयांच्या रक्षणासाठी कुणी ती टोकाची भूमिका घेत नाही जी गाईंच्या रक्षणासाठी घेतली जाते? का आज माणसांचं मरण स्वस्त आणि जनवरांचं मरण महाग झालेय? का कुणी हे म्हणत नाही की जनावरं मेली चालतील पण माणसं जगली पाहिजेत? आणि असा दिवस केव्हा पहावयास मिळेल, जेव्हा पृथ्वीतलावरील माणसं सांगतील, "माझा धर्म बुडला तरी चालेल, पण मानवधर्म जगला पाहिजे."