मुंबईत सीएसएमटी स्थानकाजवळ आज पुन्हा एकदा पूल कोसळला, काय चाललंय काय? मुंबईत माणूस ना घरात सुरक्षित आहे, ना रस्त्यावर, ना रस्त्याच्या पुलावर, ना रेल्वेच्या पुलावर, ना रेल्वेत. मरण कधी, कुठून, कुठल्या स्वरूपात तुमच्यावर घाला घालेल, कुठलीही शास्वती नाही.
ना शासन गंभीरआहे, ना प्रशासन, ना नेते, ना जनता! जनता अशाकरता की, मुंबईला नेहमीच दुर्घटना होत असतात, आणि आम्ही म्हणतो, मुंबई कधीच थांबत नाही, आणि मुंबईकर दोन दिवसांत घटना विसरून आपल्या नोकरी धंद्याला लागतो, मुंबईकर मराठी-अमराठी, हिंदू-अहिंदू ह्या मुद्यावर तासंतास, दिवसेंदिवस, महिनोन्महिने चर्चा करेल, पण जीवघेण्या दुर्घटना कशा विसरू शकतो? म्हणून जनता देखील जबाबदार!
एल्फिस्टंट, अंधेरी, येथील दुर्घटना झाल्यानंतर अनेक वल्गना झाल्या होत्या, मुंबईतील सगळ्या पुलांचे ऑडिट करण्यात येणार असे सांगितले होते, मात्र अंधेरी दुर्घटनेनंतर इतक्या कमी वेळात जर पुलाचा भाग कोसळत असेल तर कसलं ऑडिट केले तुम्ही. पुलाचा कोसळलेला भाग पाहिला तर लक्षात येते की, पुलाचा भाग अगदीच जर्जर झाल्याचे जाणवते, आणि मग पूल राहदरीकरिता बंद का नाही केला? का लोकांना मारण्यासाठी पुलावरून आणि पुलाखालून जाऊ दिले? आणि दैवाचे मला कळत नाही ते समान्यांनाच का मारते?
सध्याचे युग हे स्मार्ट युग आहे, स्मार्ट फोन, स्मार्ट टिव्ही, आणि आता स्मार्ट सिटी, कसली डोबल्याची स्मार्ट सिटी? आहे ते सांभाळता येत नाही, आणि आम्ही स्मार्ट सिटीच्या थापा मारतो. दोष कुणाचा, हद्द कुणाची, जबाबदारी कुणाची, हे ठरतानाच केस दम तोडले. मला एक कळत नाही, अधिकाऱ्यांनी किंवा अगदी सैन्याने केलेली कामे किंवा पराक्रमाचं क्रेडिट घेणारे राजकारणी अशावेळी मात्र तोंड लपवून का पळताना दिसतात? चौकशी करू, समिती गठीत करू, शिक्षा करू अशी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. कुठल्याही दुर्घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा देणारे बहादुर 'लाल' कमीच!
मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुलाची ही परिस्थिती तर मुंबईतील इतर पुलांचे न बोललेलेच बरे. का ह्या घटनेला खुनाचा आरोप लागू होऊ नये? जर तूम्ही लोकांना मरायला मोकळे सोडता, तर का तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ नये? का शिक्षा होऊ नये? जन्मठेप किंवा फाशी होऊ नये? राजकारण्यांनो, अधिकाऱ्यांनो, तुम्ही निष्पाप जिवांचे खुनी आहेत. ह्यावेळी शिक्षा झालीच पाहिजे, जबाबदार कोण? हे समोर आलंच पाहिजे, रस्त्यावर थुंकल्याबद्दल लोकांना शिक्षा देणारी महापालिका आणि सरकार निष्पाप जनतेच्या मारेकऱ्यांना शिक्षा देईल का?
No comments:
Post a Comment