Monday, March 7, 2016

माणूस मेला तरी चालेल

आज कामानिमित्त बडोद्यात होतो, कारमधून चाललो होतो. सोबत जो ड्राईवर होता, त्याचे नाव होते जाहिर! 100 मीटर गेलो असू, तोवर एक मनुष्य नो एंट्रीतुन येऊन आमच्या कार समोर उभा, थोडक्यात आमची उरभेट टळली. जहिरला म्हटले सांभाळून.
थोड्या पुढे गेलो, गाडीने वेग घेतला होता, इतक्यात रस्त्याच्या कडेने चाललेल्या दोन गाईंपैकी एका गाइने दुसऱ्या गाईला धक्का दिला व ती आमच्या गाडीसमोर आली, जहिरने आपले सर्व कौशल्य पणाला लावून गाडी थांबवली. मलाही थोड़े अस्वस्थ झाले, स्वतःला सावरत मी जहिरला सांगितले, "अरे बाबा, जरा हळू, मगाशी त्या माणसाला उडवले असते तर चालले असते, पण गाईला सांभाळ बाबा."

माझ्या तोंडून निघालेले हे शब्द सहज, म्हणजे माझ्या नेहमीच्या विनोदबुद्धीला अनुसरून निघाले का? अन्य परिस्थितीत असे शब्द माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्तीच्या तोंडून निघणे शक्यच नव्हते. आम्ही गायी-म्हशी वाली माणसं, आयुष्य त्यांच्याबरोबरच चालू झाले. सर्व पडतात म्हणून गाईंच्या पायाही पडलो, गाईँना नैवेद्य खायला दिला, त्यांची पूजा केली, आणि सर्वात जास्त त्यांना चोपही दिला. नीट घराकडे नाही परतली, द्या चोप, वासराजवळ जाऊन सर्व दूध त्याला प्यावयास दिले, द्या चोप. आज आम्ही जरी गुराढोरांपासुन दूर झाले असलो, तरी मला खात्री आहे, ज्यांचा आजही दुग्धव्यवसाय आहे, काही नं काही कारणांस्तव आपल्या गुरांना चोप देत असणार. अर्थात त्यात गाईही आल्याच.

काही गाईंना चोरगाय असेही लेबल असते, कारण ती कुणाच्याही शेतांमधे, कुंपणामधे जाऊन बिनदिक्कत चरत असते. माणसाला सृष्टीने सतसद्विवेक बुद्धि देऊनही माणसं जर चो-यामा-या करत असतील, तर ती तर मुका प्राणी, तिला ना सिमा कळत, ना कुंपण कळत, आणि राजकारण तर अजिबात कळत नाही. आणि गाईला आज जो दर्जा भारतात आहे, त्याबद्दल तीला काही माहीत असावे का? इतर सर्व मुक्या प्राण्यांप्रमाणे भूक लागली असेल तर जे काही मिळेल ते खायचे, इतकेच बिचारीला माहीत!

आणखी एक गोष्ट मला इथे जाणवली, आज गाईंची किंमत, समाजात वाढलीय, की माणसांची कमी झालीय. हे फक्त प्रचलित किंवा चलनातील वाक्य म्हणून त्याच्याकडे पाहु नये, आज जिथे काही लोक म्हणतात, की "गाय हमारी माँ है (बैलाला काही दर्जा आहे का हो आपल्या जीवनात), उसके खातिर हम मरने मारने को तैयार है". थोडक्यात काय? गाईकरता आम्ही कुणालाही मारु शकतो, स्वतःला मारू शकतो, ह्यातल्या पहिल्या अर्ध्या वाक्याप्रमाणे हे वागु शकतात, पण मरायची वेळ येते तेव्हा, सामान्य कार्यकर्ता आहे की? लाख मेले चालतील, पण पोशिंदा? अहो पोशिंदा मेला, तर हे वाद कोण उभे करणार, माणसाला माणसाशी भांडायला कोण लावणार?
माझ्या लहानपणी घराघरात एक गाईचा फोटो दिसायचा, त्या गाईच्या अंगभर देवाचे फोटो दिसायचे, आज तसे फोटो क्वचितच दिसतात, पण त्याकाळी, आज जसे वाद गाईंवरून होतात, तसे होताना दिसत नसत. कदाचित तेव्हाही गोरक्षक होतेच, पण त्यांना योग्य बळ मिळत नसावे, जसे आज मिळतेय. त्या फोटोतल्या गाईंचा अर्थ आज कळतो. मगाशी चोरगाईंचा उल्लेख आला. आणखी एक प्रकार आहे, भाकड गाईंचा, म्हणजे अशा गाई ज्या म्हणजे गाभण राहु शकत नाही, वंध्यत्वामुळे म्हणा किंवा वार्धाक्यामुळे म्हणा, गरीब शेतक-याला अशा गाई म्हणजे ओझे असतात. आणि अशा अनेक गाई कसाईखान्यात लोकांनी विकलेल्या मी पहिल्या आहेत. अर्थात दुभात्या गाई कुणीही विकणार नाही, हे तर स्पष्ट आहे. आज गोरक्षणासाठी सरसावलेल्या किती जणांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले असेल याची मला कल्पना नाही, किंबहुना किती जणांनी गाई पाळल्या असतील, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. व्यवसाय म्हणुन नाही तर गोमाता म्हणून एक तरी गाय घरी ठेवायला काय हरकत आहे? स्वतःच्या मातेला घराबाहेर काढणा-या व्यक्तींना गोमाता, जीला घराबाहेर बंधतात, घरात घेणे किती झेपेल हाही एक प्रश्नच आहे.
जगभरात गाईंच्या साधारण आठशे जाती आहेत. भारतात साधारण चाळीस शुद्ध भारतीय जाती आहेत. एक पाहणीनुसार देशी, अर्थात भारतीय जाती पुढील दहा पंधरा वर्षात नष्ट होतील, कारण सध्या अस्तित्वात असलेल्या जास्तीत जास्त गाई ह्या संकरित आहेत, देशी गाई फक्त गरीब शेतक-यांकडेच आहेत. दूध देण्याची संकरित गाईंची सरासरी, देशी गाईंपेक्षा दुपटीहुन अधिक आहे. त्यामुळे दुग्धव्यवसायींकांचा कल संकरित गाईंकडे जास्त असतो. आता प्रश्न आहे फक्त भारतीय गाईंना माता मानावे की संकरित, परदेशी पैदायीशींच्या गाई सुद्धा आपल्या माता आहेत, हे स्पष्ट झालेले नाही, कारण परदेशी गाई मग त्यात इंग्लिश आल्या आणि इटालियन सुद्धा आल्या, नेता म्हणून इटालियन बाई आपल्याला  चालत नाही, गाई तरी चालतील का हा प्रश्नच आहे. अगदी पाकिस्तानी गाईही असाव्यात, त्या तर मुळ भारतीयच असतील. आपल्या गोमातेला पाकिस्तानच्या ताब्यातुन मुक्त करण्यासाठी कुठलाही कार्यक्रम दिसत नाही. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे जगभरात गाई आहेत, गोमांसाचे सेवनही जगभरात होत असावे, ते आपण कसे खपवून घ्यावे, भारतात आपण आपल्या लोकांविरोधात गोसन्मानासाठी भांडतो, परदेशात ज्या गोहत्या राजरोस होत आहेत, त्या कोण थांबवणार? की तिथल्या गाई गोमाता व्याख्येमधे बसत नाही?

कुणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकांनी कायद्याच्या चौकटीत राहिलेच पाहिजे, हेही मी मानतो. भारतीय संघराज्याचे गृहराज्यमंत्री किरण रिजुजु हे मागे म्हटले होते की ते देखील गोमांस खातात. कदाचित बैलाचे मांस असेल. भारतात बीफ हा जो काही प्रकार आहे, तो फक्त मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजच खात असावा, हा समझ खोटा आहे. इतर धर्मीयही खात असावे. बीफ हे इतर मांस प्रकारापेक्षा स्वस्त असते व त्यामुळे देखील ते खाल्ले जात असावे. माझ्यासारख्या मांसहारी परंतु बीफ हा प्रकार न आवडणा-या व्यक्तीलाही घराबाहेर, उपहारगृहात मांस खाताना, ते बीफ तर नसावे नां असा नेहमी संशय येतो, तो ते स्वस्त असल्याने, आणि म्हणूनच त्याची भेसळ करणे सोपे व सोयीचे जात असावे. तरीही मला स्वतःला असे वाटते की, काय खायचे यावर बंधने घालणे योग्य नाही, गोमांसावर बंदी महाराष्ट्रात ऐशीच्या दशकापासून आहे, परंतु आता गोवंश हत्या बंदी कायदा झालेला आहे.

गाई मुस्लिम किंवा ख्रीस्तांसाठी फक्त एक खाद्यपदार्थ आहे का? अर्थात नाही. कितीतरी मुस्लिम आणि ख्रीस्त बांधव गाई पाळतात त्या दुग्धव्यवसायासाठी. त्यांच्या मनात गाईंबद्दल ती भावना नसावी, जी एका सनातन हिंदुच्या मनात असते, पण गाईंचे पालन नक्की आस्थेने होत असावे, यात शंका नाही. उलटपक्षी गाईंचे आणि धर्माचे राजकारण करणा-या एका नेत्याची, मांस निर्यात करणा-या कंपनीत भागीदारी असल्याचे मध्यांतरी व्रुत्तवाहिन्यांनी उघड केले. थोडक्यात आपल्या सोयीने व आपल्या शर्तीवर गोधर्म पाळणारे अनेक मिळतील. ह्यातले सच्चे गोप्रेमी किती असतील, हा संशोधनाचा विषय आहे.

आज भारतात शेकडोंनी बलात्कार रोजच्या रोज होत आहेत, डझनवारी खून रोज भारतात होतात. स्त्रीची इज्जत लुटली जात असताना, कुठलाही नेता असा नाही, जो म्हणेल, स्त्रीच्या सन्मानासाठी आम्ही मरणा-मारण्यास तयार आहोत. हिन्दू धर्मग्रंथात स्त्री सन्मानाची शिकवण नाही? सीता हरणामुळे रामायण व द्रौपदी चिरहरणामुळे महाभारत घडल्याचे दाखले धर्मग्रंथात आहेत. का स्त्रीयांच्या रक्षणासाठी कुणी ती टोकाची भूमिका घेत नाही जी गाईंच्या रक्षणासाठी घेतली जाते? का आज माणसांचं मरण स्वस्त आणि जनवरांचं मरण महाग झालेय? का कुणी हे म्हणत नाही की जनावरं मेली चालतील पण माणसं जगली पाहिजेत? आणि असा दिवस केव्हा पहावयास मिळेल, जेव्हा पृथ्वीतलावरील माणसं सांगतील, "माझा धर्म बुडला तरी चालेल, पण मानवधर्म जगला पाहिजे."



No comments:

Post a Comment